आरशाने दाखवावा मी जसा आहे तसा
पण कसा टाळेल तो माझ्याच डोळ्यांचा ठसा
वाटते भीती मला अज्ञात जागांची जरा
खोल मी हृदयात माझ्या जात नाही फारसा
ना कधी कोणास मी वादात मज जिंकू दिले
ना मला कळले कधी मी नेमका आहे कसा
वाचले भरपूर मी उपदेशही केले किती
वाटते पण आज कोणी दाखवावा आरसा
ऐकले माझे जगाने मी जगाचे ऐकले
मीच माझे ऐकण्याचा घेतला आता वसा
- निलेश पंडित
३ जानेवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा