हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

इस्टेट

पाहिजे इस्टेट आम्हा पूर्वजांची चांगली
मात्र येथे पातके त्यांची कशाला मांडली?

राहिलो जगभर तरी आम्ही बदलणे टाळतो
वेस सोडा कूस आईची नसे ओलांडली

संस्कृती प्राचीन असणे गर्व आहे आमचा
हो जरी इथली प्रजा बहुतांश आहे गांजली

पावसाला अन् पुराला दोष द्यावा का ... कसा?
माणसांची वारुळे आम्हीच होती बांधली

थोर-मोठ्यांच्या शवांचे खंड आम्ही पचवले
आमची शतकानुशतके रांग आहे रांगली

सोडले मी गाव माझे शहर म्हटले आपले
आणि मग पुढची पिढी परदेश दिसता पांगली


- निलेश पंडित
५ जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा