हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २ जानेवारी, २०१८

बाधा


(वृत्त: मदनतल्वार)

घनघोर पेटता महायुद्ध बेचिराख झाली होती घरटी कैक
चाळी वाड्यांच्या छपरांखाली तगली जगली डोकी मात्र अनेक
... माफक गरजा हाताच्या बोटांवरती मोजाव्या इतक्याशा होत्या
समुहात जन्म समुहातच जगणे तिथेच अंतिम घटका हाच विवेक

विज्ञानाला अद्याप लाभली नव्हती गतीज माया झगमगणारी
जन्मास पिढी नव्हती आली जोखड रूढींचे यथेच्छ झुगारणारी
... लीलया पाचपन्नास सहज एकाच भव्य छायेत नांदले तेव्हा
कित्येक क्षीण रोपटी न मरता जगली पण घुसमटली मोहरणारी

काळाचा अवघा पोत बदलता दिशा नि स्वप्ने अंतर्बाह्य बदलली
खंगली जहाजे प्रत्येकाची वेगवेगळी केवळ होडी उरली
... कापती दिव्य अंतरे त्यातल्या काही अन् बुडती  काही झगडून
गतिहीन रूढ सीमित स्थैर्याला अवचित बाधा अस्थैर्याची जडली

ह्या युगायुगांच्या प्रवासातली दिशा कोणती गती किती हे कळते
पोचणार कोठे कोण कधी अन् कसे काय हे कोडे सदैव उरते
... हा कृष्णधवल शीतोष्ण जणू वैचित्र्यपूर्ण अतिरेकांचा अतिरेक
सुख जळणे जगण्यासाठी थोडे जगणे जळण्यासाठी ह्यातच वसते


-  निलेश पंडित
३ जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा