हा ब्लॉग शोधा

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

दैव

पानापानामागे सल वाळवी सारखा
आनंदी चेहरा प्राण सुखास पारखा
नपुंसक मोहराचे क्षण येती जाती
जन्मतात मरतात जन्मभर नाती

थंडी पावसात उन्हातान्हात वाढणे
वीज कडाडता भीतीत्राग्यात कुढणे
चाचपडणे सतत अटळच माथी
दृष्टी खिळते आकाशी पायाखाली माती

गूढ दृढ चिरंतन अनिश्चित सारे
वाटती काजवे तेच ठरती निखारे
विचारास चिकटते अतर्क्यसे स्वप्न
बाह्यजगात इंद्रिये जीव आत्ममग्न

दैव थोर किती असतात उपलब्ध
शाश्वत चेहरे आणि मुबलक शब्द

- निलेश पंडित
१४ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा