हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ जून, २०१८

हुशारी


कर्मचारी नोकरीसाठी करारी पाहिजे
आणि थुंकी झेलण्याचीही तयारी पाहिजे

सून कर्तबगार सुंदर अन् सुशिक्षितही हवी
आमच्या व्यसनी मुलाचे ऐकणारी पाहिजे

माणसे आम्ही सुशिक्षित जाणिवेने वागतो
पण निरक्षर गुंड आम्हाला पुढारी पाहिजे

होय ... माझी वरकमाई गरज इतरांसारखी
मात्र आकाशात देशाची भरारी पाहिजे

बांधले देऊळ आहे स्वच्छ मंगल आमचे
धूर्त पण स्वस्तात एखादा पुजारी पाहिजे

गाजराच्या खूप पुंग्या लोकशाहीने दिल्या
मोडल्या कित्येक आता वाजणारी पाहिजे

सारखे नसते नसावे वागणे अन् बोलणे
वर तसे नसणे लपवण्याची हुशारी पाहिजे


- निलेश पंडित
२३ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा