हा ब्लॉग शोधा

शनिवार, ७ जुलै, २०१८

अश्रू

वाटले असते तसे नसतेच काही व्हायचे
दोन क्षण भाळायचे आयुष्यभर सोसायचे

बोलली होतीस तू कोड्यात सारे शेवटी
ठेव हे लक्षात तू आहे मला विसरायचे

वाढले अंतर पुढे बत्तीस वर्षे लोटली
राहिले हातात फुटकळ आकडे मोजायचे

दोन साध्या पायऱ्यांचे सूत्र आयुष्यातले
चेतवाव्या वासना पण मन पुढे मारायचे

आतल्या आतच बरी मी ढाळलेली आसवे
वेगळे अश्रू जरा नाही कधी वाळायचे

जा भले तू आणि कोणाहीबरोबर जग पुढे
वाटणे माझे तुझ्याबद्दल कसे वाटायचे

गैरसमजातून केली मी नको ती धाडसे
मापले अंतर तरी नसते असे कापायचे

- निलेश पंडित
८ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा