हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

पट्टा


हमी देतो तसा मी मोकळ्या आहे विचारांचा
मला मंजूर चर्चा नेहमी असते समस्यांची
तसा सत्यात स्वातंत्र्यात तर विश्वासही माझा
परंतू तीव्र अॅलर्जी विवेकाची व तर्कांची

मला त्यातून जर केले निरुत्तर नेमके कोणी
विषय तात्काळ त्यावेळी बदलतो मी शिताफीने
मला साकल्य सामंजस्य आठवते अशा वेळी
जरी पळवाट प्रत्यक्षात सोयीच्या विचाराने

विरोधाभास माझ्या बोलण्यामध्ये भले असतो
अशातच काढतो मी शस्त्र वर उद्दाम क्रोधाचे
पुढे तर सोडतोही नम्रता अन् सभ्यता सारी
वळण घेतो अचानक बोचऱ्या खिल्ली विनोदाचे

पशू मी मूळ माझ्या आत वसते पाशवी वृत्ती
कुणी हेरून नकळत बांधतो पट्टा गळ्याभवती


- निलेश पंडित
८ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा