हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

सीमा


भूतकाळाने सुरू केले अलौकिक व्हायला
आज माझी डायरी मी घेतली वाचायला

मिटत आता चालल्या आहेत अंती पापण्या
दूर आहे लागली सनई कशी वाजायला?

टाळले होतेस अन् गेलीसही टाळून तू
आज का आलीस तू स्वप्नात हे सांगायला?

चंदनाची शेवटी होती म्हणे रचली चिता
आपला कोणीच नव्हता मात्र अग्नी द्यायला

राष्ट्र येथे माणसांसाठीच सीमा ठरवते
लागते जपण्यास ती मग माणसे मारायला

समजण्यासाठी कधी जग जग खरे समजू नये
लागले आयुष्य अवघे एवढे समजायला

- निलेश पंडित
७ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा