हा ब्लॉग शोधा

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

तल्लीन

"स्वच्छता हीच महात्माजींना खरी श्रद्धांजली"
हे शब्द भाषणातले
तल्लीन होऊन ऐकताना
आनंदाश्रू तरळले नाम्याच्या डोळ्यात
बघताना
गटारापलिकडच्या
पदयात्रेचा शेवट

इतक्या समाधानानं की
धुरपा झोपडीबाहेर येऊन
लक्षीनं आदल्या रात्री
तिचं खोपट सोडून
कुठल्याशा सायबाकडे जाताना सोडलेल्या
अपघातानं जन्मलेल्या
धुरपा-नाम्याच्या नातवाला
... समोरच्या सांडपाण्यात लघवी करून
तिथेच हात थापटत बसलेल्या
चिरक्याला ...
गेली घेऊन झोपडीत
हे समजलंही नाही त्याला

... कारण
तो रमला होता आठवणींमध्ये
त्याच्या बालपणाच्या
जेव्हा वेशीबाहेरच्या
कुडाच्या खोलीत
मालकानं दिलेल्या जुन्या रेडियोवर
दलितांसाठी गांधीजींनी वापरलेलं
नवं संबोधन "हरिजन"
ऐकून असाच हरखला होता
बा त्याचा


- निलेश पंडित
१३ आॅक्टोबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा