हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ५ जुलै, २०१९

निवडुंग

(वृत्त: भूपती)

रखरखीत होते अवतीभवती सारे
मृगजळाचेच रेतीवरती वाफारे
... पाऊस नसे आर्द्रता नसे थोडीही
रणरणती जमीन उष्ण हवा अन् वारे

वादळे भयंकर त्यात भरीला येती
चक्री वा केवळ उंच उसळती रेती
... संथावत जाता यथाकाल सारे ते
शांतता देतसे गूढाचीही धास्ती

विधिलिखित जणू साथीला कोणी नसणे
तुरळक तांड्यांची वर्दळ दुरून बघणे
... रोवून खोलवर पाय धरेच्या आत
डगमगल्याविण तग धरून संतत जगणे

त्या शुष्क रुक्षशा अभेद्य वातावरणी
थेंबाथेंबाने साचवते ती पाणी
... काटेरी हरित त्वचेची म्हातारी ती ....
राखते आत्मबल ही कोणाची करणी?

मी मुग्ध अचंबित उंटावरती बसतो
अन् प्रखर उन्हापासून स्वतःला जपतो
... सफरीत जमवतो अनेक व्हिडिओ, फोटो
सावलीत निवडुंगावर कविता करतो


- निलेश पंडित
६ जुलै २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा