हा ब्लॉग शोधा

शनिवार, १४ मार्च, २०२०

रममाण

(वृत्त: भूपती)

सृष्टीत रंगतो मी अद्भुत रंगांच्या
बदलत्या छटा मोहविती आकाशाच्या
... कोड्यात टाकिती हिरवी पिवळी पाने
प्रेमात मात्र मी रंगहीन पाण्याच्या

शब्दात शब्द गुंफून लिहावे काही
उपमा रुपकांनी अधिकच सजवावेही
... लय त्यास लाभता होते सुमधुर गाणे
पण ह्रदय शोधते नि:शब्दाची ग्वाही

कानांना पडते सप्तसुरांची भूल
वाटते जणू ती स्वर्गाची चाहूल
... शब्दारंगागंधाविण अमूर्त माया
त्याहून तरी मी शांततेत मश्गूल

रममाण चित्त असण्यात नेहमी असते
अंतरात चिंता नसण्याचीही वसते


- निलेश पंडित
१५ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा