हा ब्लॉग शोधा

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

क्लांत

 

कोणी कधी झिडकारताही नेहमी तो शांत होता

इतकाच होता फरक त्यांच्याहून तो उत्क्रांत होता


होती म्हणे ही संस्कृती प्राचीन काळी शक्तिशाली

आश्चर्य केला खंड कोणी सहज पादाक्रांत होता


आग्रह नसावा सिद्धतेचा अन् नका मागू पुरावा

विश्वास श्रद्धा शरण जाणे हा म्हणे सिद्धांत होता


आजन्म लोकांना दिले व्रत सत्य, निष्ठेचेच त्यांनी

हिंसा व खोटे योजणे हा फक्त त्यांचा प्रांत होता


मी वाचता पोथ्या जुन्या साधर्म्य सहजच दिसत गेले

शोषक व शोषित स्पष्ट अन् अस्पष्टसा दृष्टांत होता


मंजूळ सनईची सुरावट शोभली उद् घाटनाला

कळलेच नाही त्या सुरांनी दाबला आकांत होता


स्वातंत्र्य करतो साजरे तो आजही जोमात मोठ्या

यंदा जरासा जीर्ण दिसला चेहराही क्लांत होता



- निलेश पंडित

१६ आॅगस्ट २०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा