हा ब्लॉग शोधा

बुधवार, २९ जुलै, २०२०

दुखापत



बीजामधून आपल्याच अंकुरलेल्या रोपावर कोणी
सावलीत आपल्याच नकळत करीत जाते डंख खोलवर
आच्छादित सुकलेली पाने

कुणी वेल नाजुकशी दिसते आणि बिलगते महाकायशा
वृक्षाला ... पण विळखा घालित शोषित जाते जीवनसत्वे
त्याची सारी निर्दयतेने

कधी वृक्ष एकाच कुळीचे अन् वंशाचे उभे राहती
दृष्टीक्षेपामधे परंतू कधी कुठे भेटती न त्यांच्या
पारंब्या वा खोल मुळेही

वेगवेगळे सर्व निरंतर परिस्थितीचे डंख भयंकर
आणि त्यातल्या दुखापतीही वेगवेगळ्या ज्याच्या नशिबी
त्यास वेदना त्याच्या देही

माळावर विस्तीर्ण परंतू कुणी उभा उरतो एकाकी
डंख-दुखापतही करण्यासाठी कोणीही दूरदूरवर
ज्याच्या भवती शिल्लक नाही

कैक युगे येता जाताना असून साक्षी संतत केवळ
कोणी त्यास न बाधू शकता आतुरतेने अंतिम एका
डंखाची तो मागे ग्वाही


- निलेश पंडित
३० जुलै २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा