हा ब्लॉग शोधा

शनिवार, २९ मे, २०२१

स्फुट - माणसं

 

माणसं नसतात फक्त दोन प्रकारची 

- आणि फक्त दोन प्रकारचीच असतात माणसं.


मनाची कुरूपता कमी व्हावी असं मानणारी

- ती कमी होत नाहीच कधी असं मानणारी. 

- अशी कुरूपता कमी व्हावी पण त्यासाठी ती आधी वाढेल असं समजणारी आणि हे अतर्क्य तत्व न समजणारी! 


आपला तो नाइलाज, इतरांचा तो भ्रष्ट-आचार म्हणणारी ... आणि भ्रष्ट नसणारी.


क्षुल्लकीकरण किंवा जगबुडी ह्यातील एक कल्पना सतत नकळत मनात पाळणारी ... किंवा नेमकं हे दोन्ही टाळून विवेक मनात पेरणारी, रुजवणारी. 


विषमता नष्ट नाही तरी कमी व्हावी असं म्हणणारी ... विषमता कमी होणं म्हणजेच अशक्य अशी समता असं म्हणत  गोंधळणारी, भांबावणारी. 


माणसामधे सर्वशक्तिमान, आदर्श देव पाहणारी. 

देवामध्येही  साधा, सहज, चुकू शकणारा सरळ-सामान्य माणूस पाहणारी. 


निराशाजनक सत्य लपवत आशा वाटत निराश होणारी - निराशाजनक सत्य स्वीकारत आशा ठेवून कधी निराश न होणारी.


हे असंच असतं नेहमी ... ते तसं नसतंच कधी असे जाहीरनामे प्रसृत करून मनाची कवाडं कायम बंद करणारी माणसं. नाविन्याची आस सृजनशीलतेनं जपणारी माणसं.


निसर्गतः लाभलेलं पशूत्व स्वीकारून त्यावर माणूसपणाचंही आवरण रोवणारी, फुलवणारी माणसं. इतरांचंही माणूसपण नेस्तनाबूत करून आतल्या पशूस पिसाळण्याची मुभा देत स्वतः (स्मितहास्य कायम ठेवत) पिसाळणारी माणसं.


सगळं दोन प्रकारांमध्ये विभागता येतं असं मानणारी आणि तसं न मानणारी. 

प्रत्येक विषयात दोन टोकं पाहणारी आणि दोन टोकांमधला विषय पाहणारी.


दोन प्रकारची असतात माणसं. 

अनेक प्रकारची ... माणसं असलेली माणसं. 

अनेक प्रकारची ... माणसं नसलेली माणसं.



- निलेश पंडित

३० मे २०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा