हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ जून, २०२१

आशा

 

हा खेळ असाच असावा बहुतेक. मन नाही नाही म्हणत राहिलं तरी देहमनाला कधीही चुकवता न येणारा. 

अंधारातून अचानक प्रकाशात येताच डोळ्यासमोर येते अंधारीच. प्रकाशातून अंधारात येताच सरावण्याची स्वप्नं ज्या डोळ्यांनी रंगवली त्या डोळ्यांसमोर उभा राहतो फक्त अभेद्य अंधार. यथाकाल सरावण्याचं स्वप्न साकार झाल्यानंतरही त्या अभेद्य अंधाराचं अविचल अटळ गडद सावट राहतंच डोळ्यांवर आणि मनावरही. तरीही स्फुरतात, विरतात, उरतात स्वप्नं.

पलिकडे काय ह्याचं कुतूहल पण भीतीही. अलिकडे जे आहे त्याचं समाधान तसंच वैषम्यही. जितका लाभला त्याहून अधिक हवासा वाटणारा काल्पनिक आवाका. शांततेचे गोडवे गाताना शांततेलाच नकळत भंग करणारे उद्गार! उत्तराच्या अभिलाषेनं आणि अचानक लाभाच्या आभासानं जिथे धाव घ्यावी तिथे उत्तराच्या वेषात दडलेले असाध्य प्रश्न आणि जिथे प्रश्न सामोरे आल्यामुळे  भांबावून भयभीत व्हावं तिथे श्वास चालू आहे तोपर्यंत अकस्मात प्रश्नांआडून समोर अनपेक्षितपणे येणारी तात्पुरती पण जगवत ठेवणारी तथाकथित उपयुक्त उत्तरं! 

अंधारात अभिलाषा प्रकाशाची आणि प्रकाशात अंधारातील दृष्टीहीनत्वाची आणि शाश्वत शांततेची अतूट कल्पना - भीतीही. द्वंद्व ... सतत द्वंद्व, ज्या द्वंद्वाला आव्हान देणारं मात्र दुसरं काहीही नाही असा चिरंतन विरोधाभास. 

सतत आवेश ... आणि आवेशात अनिश्चिततेतून जन्मलेली गूढ असहाय्यता. निसटतं ते पकडण्याची धडपड आणि पकडीत असल्याचा आभास होताच ते न निसटू देण्याची - तोपर्यंतच जोपर्यंत हे उमगतच नाही की पकडीत कधी काही नव्हतंच - नसतंच!

शब्दांचा जिरेटोप जसजशी बेमालूम झाकतो ही असहाय्यता, सुरांचा-रंगांचा मुलामा वर मढवतो त्या शब्दांची  चाकोरी आणि मग आपण बळेच म्हणत जातो तिला अमर्याद व्याप्ती - पोकळी, अगतिकता न म्हणता - आकाशात भरारी घेण्यासाठी वगैरे - तसतशी चढत जाते नशा आयुष्यात. ती पुरते अथपासून इतिपर्यंत. 

का म्हणां उगीच कुणी - नशा वाईट! तीच तर एक आहे जी उपजते, साचते, स्मरते आणि विरते अशी एकमेव अभ्युदयाची आशा - अगदी अस्तापर्यंत. 


- निलेश पंडित

२० जून २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा