हा ब्लॉग शोधा

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

रस्सीखेच

 

स्वप्नाचे साम्राज्य  भय अविभाज्य

प्रकृतीचे राज्य  अटळसे


शब्दाशब्दातून   अर्थाचा आभास

बदलाचा भास   वरवर


शब्दांमध्ये शब्द    मिसळता गुंता

आणि व्यर्थ चिंता   जन्मा येती


कुणा कुणी व्यक्ती   कुणास आसक्ती

कुणा देशभक्ती    भिन्न ध्यास


नि:शब्द प्रवृत्ती   दृढ स्थित चित्ती

भाषेची आहुती  जळे तीत


भाषांची वादळे   निरर्थक धग

बदलते जग   अल्पमात्र


दडे दबकत    पाऊल टाकीत

प्रत्येक मनात   जनावर


हजारो वर्षांत  अंशमात्र फक्त

जाते बदलत   खरोखर


प्रकृती उत्क्रांती   ह्यांत रस्सीखेच

बदलाचे हेच   सत्य अंती



- निलेश पंडित

२५ आॅक्टोबर २०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा