हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

कैफ

 

शक्तीच नव्हे तर युक्तीही 

सतत वाढवत

त्याने कधी कातला कापूस

कधी लोंबकळण्यासाठी

वापरल्या पारंब्या 

कधी मुळांपासून तोडले वृक्ष

कधी जेवण्यासाठी केल्या पत्रावळी

तर कधी रचली

माणसांच्या चितांसाठी

लाकडांचीही चिता


तंतू तंतू एकत्र करून

भरड्या मजबूत

दोरखंडाचा मुबलक वाढीव वापर

रांगड्या आदिम वातावरणात

काहीही कसंही बांधण्यासाठी

करत राहिल्याने

त्याचा वाढत राहिला विश्वास

एकत्रीकरणाच्या क्षमतेवरचा


कधी माणसांना एकत्र करून

मारली जनावरं

कधी जनावरांचे तांडे, समूह, दळं

करून मारली माणसं.


... जसजसा ओसरला

शक्तीचा कैफ

तसतशी जागी होऊ लागली

अमर्याद जाणीव.


एकत्रीकरणाच्या आभासापोटी

त्याने साधलं होतं

युगानुयुगे

फक्त विघटन

आणि

स्वतःला अजेय समजत

तो झाला होता

सपशेल पराभूत



- निलेश पंडित

३१ आॅक्टोबर २०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा