हा ब्लॉग शोधा

रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

थांब जरा

 (डिलन थॅामस ह्यांच्या Do not go gentle into that good night ह्या कवितेचा स्वैर भावानुवाद)

(वृत्तः विजया, आकृतिबंधः Villanelle)

सुखनिद्रेच्या अंतिम निशेत लोपू नकोस तू सहज असा

वार्धक्याला शोभतात प्रदीप्त ज्वाला विझण्याआधीही

जळती मशाल तू जळत रहा जप तेजाचा जाज्वल्य वसा

जाणती सुज्ञ काळोखच अंती ग्रासण्यास आतूर कसा

उमगून आपली छाप न आहे अजुन इथे पडलेलीही

सुखनिद्रेच्या अंतिम निशेत लोपू नकोस तू सहज असा

चारित्र्यवान मानेने ताठच जगत उमटवित खोल ठसा

समजती आपली कर्तव्ये कित्येक शेवटी उरलीही

जळती मशाल तू जळत रहा जप तेजाचा जाज्वल्य वसा

ते मुक्त पथिक ज्यांचा तेजाने सूर्य भरतसे रोज पसा

मावळतीला अंधाराशी ते तगमगती पण लढतीही

सुखनिद्रेच्या अंतिम निशेत लोपू नकोस तू सहज असा

क्षण शेवटचा परिपक्वतेत आधार देतसे हलकासा

कवळून क्षणाला त्या योद्धे तळपत दिसती आनंदीही

जळती मशाल तू जळत रहा जप तेजाचा जाज्वल्य वसा

विनवितो मला मृत्यूच्या उंबरठ्यावर वर दे छोटासा

दे राग लोभ वा रागाने दे शापांची सरबत्तीही

सुखनिद्रेच्या अंतिम निशेत लोपू नकोस तू सहज असा

जळती मशाल तू जळत रहा जप तेजाचा जाज्वल्य वसा

- निलेश पंडित 

२ फेब्रुवारी २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा