हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

क्लेश

 

मागे वळून पाहताना 

एखाद्या शिलालेखाप्रमाणे

अजरामर झालेले

आयुष्यातले 

आयुष्याला पुरून उरणारे

जीवघेणे क्रूर 

त्या वेळचे वेदनामय क्षण

होत जातात किंचित् अस्पष्ट 

टिकूनही खोल

दृढावून निबरलेले


वेदना संपली

तरी न जाणारे व्रण

धुळीने माखून होतात 

दृश्य राहूनही निर्जीव


वेदनेवर जिरेटोप चढवून

हारतुरे घालून

गोंजारून

तिचं प्रदर्शन करण्याचा काळ

जातो सरत

समुद्रकिनाऱ्यावरच्या

हातातून झरत निसटत जाणाऱ्या 

वाळूप्रमाणे


तसंच काहीसं अनुभवत 

उभा आहे मी एकटा

क्षितिजाच्या दिशेने

मावळत्या सूर्याकडे 

पहात


क्षणिक आशेने

येणाऱ्या जाणाऱ्या 

तुरळक होड्यांकडे बघत

आशाळभूत नजरेने


ढगांनी न आच्छादलेला

असा मावळता सूर्य 

बघत राहणं

असतं केवळ क्लेशकारक



- निलेश पंडित 

१९ जुलै २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा