प्रगती
मनात माझ्या खोल तळाशी, सदैव वसती दोघेही "मी"
खेचाखेची, तुंबळ युद्ध नि हमरी तुमरी असे नेहमी
एक चालतो मार्ग चोख जो तर्कशुद्ध अन् बुद्धीवादी
पूजित गूढा भित्या मनाने दुजा चालवी जुनीच गादी
पराभूत होउनि कधि पहिला थरथर कापत घरा परततो
अंधाराचे शंख वाजवित दुसरा छद्मी त्यास भिववितो
परंतु पहिला उजळ मुखाने कधी यशस्वी परते जेव्हा
"यश हे केवळ परंपरेचे"...म्हणीत दुसरा हरखे तेव्हा
नशा यशाची चढून बाधक, पहिला जेव्हा कधि भरकटतो
दुसरा घेतो लगाम हाती, माघारी पहिल्या दामटतो
परी जेधवा दोघांवरही निष्ठुर, दारुण येई संकट
गृह रक्षाया एक होउनी, उभे राहती दोघे बळकट
परस्परांची गरज निरंतर, म्हणुनि जुळे हे जन्मा येती
जपति-तोडती पाश जुने अन्, साधति त्यातहि काही प्रगती
- निलेश पंडित
१४ जून २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा