बडबड्या आस्तिकांनो -
(केवळ स्वच्छ विनोद म्हणून...लोभ असावा..रोष नसावा)
शब्दभारी भाषणाची
का तुम्हाला खुमखुमी?
द्याविशी वाटे तुम्हाला
ईश्वराची का हमी?
या जरा...या पाहू या
हे शब्द तुमचे वेगळे
बोलता अर्थाविना
हे कसब तुमचे आगळे!
"माया असे ब्रह्माविना..
अन ब्रह्म ही तर पोकळी
पाहण्या जे ब्रह्म जाता
भासे धरा ही मोकळी.."
"ब्रह्म हे सर्वत्र आहे..
ब्रह्म तो अन ब्रह्म मी
देह नश्वर..अमर आत्मा.."
- सांगता ऐसे तुम्ही!
खर्चुनी मग शब्द सारे
सम खरी गाता तुम्ही
"..देव शब्दातीत आहे..."
- हेच म्हणता नेहमी!
आमुचे ऐका जरा...
मौन आता बाळगा...
शांतता मग नांदुनी
जगु दे जरा साऱ्या जगा!
- निलेश पंडित
८ डिसेंबर २०१०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा