आई
सूर्यास्ताचा मार्ग
धरतात सगळे
तसा तो तूही
धरलास आई
पण सगळ्यांची वाट
आपापली होती
तू मात्र
प्रत्येकाची वाट
चाललीस बाई !
सगळ्यांच्या होत्या
आवडी निवडी
तुझी निवड
फक्त उरल्या सुरल्याची
बाकीच्यांनी रचले
संसार आपापले
तुझी छबी फक्त
त्यांतच मुरल्याची
केलंस आम्हा तरबेज
काळोखातही चाचपडण्यास
पण घेऊन गेलीस
स्वतःबरोबर प्रकाश
तू असताना जे होतं
लखलखीत..स्वच्छ...निरभ्र
ते आता झालं अंधुक...
...आता अंधारलं आकाश
- निलेश पंडित
१४ मे २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा