ज्ञानपिपासू
 
 असेल बुद्धी पलिकडचा तर
 अलीकडे का आणता त्याला?
 असेल शब्दातीत देव जर
 शब्दच्छल तर करा कशाला?
 
 श्रद्धेचा म्हणता म्हणता जो
 हळू हळू तर्कातहि शिरतो
 सूर्य प्रकाशाहुनी स्वच्छ जे
 त्या अनुमाना दूषित करतो!
 
 भुरळ पाडुनी मोहक मोहक
 स्वप्नांची जो जनां फसवितो
 स्वतः घेतो श्रेय यशाचे
 वैफल्याचे तुम्हांस देतो!
 
 खरेच का तो देव मित्रहो?
 का हे केवळ संधी साधू?
 कफनी...माळा...भोंगळ भाषा
 वापरणारे लबाड भोंदू?
 
 कुठे आढळता त्रुटित कल्पना
 धीर करुनि या स्पष्ट तपासू
 भक्ती आधी बुद्धि वापरू
 तरीच म्हणवू ज्ञानपिपासू  !
 
 - निलेश पंडित
 जुलै २०११
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा