हा ब्लॉग शोधा

सोमवार, २३ जुलै, २०१२

तळघर

परदेशातून येतो
स्नेह देतो...घेतो...
भेटीची असते ऊर्मी
कुठे अधिक - कुठे कमी

तसंच थोडं कुतूहल
...त्याही खाली
खोल तळाशी
अंतर्मनात
काही सल

लोक देतात दिलासा
घेतात कानोसा

(इकडे...)
इथे सगळंच बिघडलंय
तिकडे आहात तेच बरंय
भ्रष्टाचार बोकाळलाय
गुंड - गुंड चेकाळलाय

(तिकडे...)
एकाकीपणा फार...नाही?
अन्नाचे फार हाल...नाही?
मुलं होतात बेताल...नाही?
बिघडते मुलींची चाल...नाही?

आमचंही काहीसं तसंच
देतो दिलासा - घेतो कानोसा

नशीबवान आहात
राहता नव्या भारतात
पैसा वाहतोय...
देश सुधारतोय
प्रत्येकाचा
भाव वधारतोय !

पण -
खरंच सुधारतोय...?
शोषण थांबलंय...?
ते सोळा सोळा तास काम...?
ते तणावात गाळणं घाम...?
जीवघेणी स्पर्धा ती...?
ती नोकरीतही अनीती...?
..........................
चेहरे विस्कटतात
डोळेही पुसतात
एकमेकांचा निरोप घेतात
हसून वरवर
झाकून....बंद करून
मनातलं तळघर

- निलेश पंडित
६ मे २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा