आई
 
 वादळ, वारा, वीज, पाऊस
 त्यात ढगांचा गडगडाट
 आईची हाक कानी येते
 स्वरांत काळजी काठोकाठ
 
 "बाळा, पावलं जपून टाक
 किडे, काटे, धोके पाहून
 परमेशाचं नाव जप
 मीत्व त्याला वाहून..
 सूर्यप्रकाश पाठीराखा
 खचितच तुला दिसेल
 रोमारोमात आयुष्याच्या
 ऊर्जा, ऊर्मी वसेल.
 थांबू नकोस थकून मात्र
 पावलं आपली टाकत राहा
 काटेरी...पण सुगंधी...फुलं
 मनस्वितेत हुंगून पाहा."
 
 आईला जाऊन वर्षं लोटली
 तरी मनी वसे रूप
 आई...अशीच जवळ राहा
 माया कर खूप....खूप....
 
 - निलेश पंडित
 ३ एप्रिल २०१०
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा