हा ब्लॉग शोधा

रविवार, २९ जुलै, २०१२

मन

वेग मनाचा
विचित्र भारी
अजाणता कधि
कधी जाणता
कधि भूताची
कधि येत्याची
त-हा विचारी

कुतूहलातच
आयुष्याच्या
काळा सोडुन
अथांग क्षितिजे
शोधित राही

हाती गवसे
ते ते झाकुन
निसटुनि जाती
त्याच सुखांची
स्वप्ने पाही

सोंग घेउनी
नियंत्रकाचे
अशक्य तत्वे
कवटाळुनि कधि
स्थितप्रज्ञ
म्हणवीत स्वताला....
अपयश येता
ढोंग उतरवी.....
हताश होउन
पुसे आपणा
असा कसा मी
कुठे चाललो
कोण कोठला?

अखेर थकुनी
धुके पांघरुनि
डोळ्यांवरती
पुन्हा विसावे
गोंजारित मग
क्षण हातातिल

उभे राहण्या
धुके निवळता
पुन्हा एकदा
झेपावुनि मग
चांचल्याने
चाचपण्यास्तव
क्षण भूतातिल...
भवितव्यातिल....!

- निलेश पंडित
२२ एप्रिल २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा