हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३१ जुलै, २०१२

पूजा

(वृत्त: शार्दूल विक्रीडित)
कुंकू कापुर नारिकेल तुलसी दुर्वांकुराची जुडी
जास्वंदी, बकुळी, गुलाब...सगळी केली तयारी पुरी
मांडामांड करूनि मूर्ति सगळ्या पूजा स्थळी स्थापल्या
पूजेला यजमान आदि बसले पाटांवरी आपल्या

हेरंबास पुजून देव सगळे पूजेस पाचारिले
संकल्पास स्मरून मंत्र विधिचे सुस्पष्ट उच्चारिले
भक्तीपूर्वक एक एक करुनी सारे फुले वाहती
"देवा...नित्य कृपा अशीच असु दे", देवांस आवाहती

पूजा संपुन भोजनात रमती आनंदुनी पाहुणे
लक्ष्मीचा जणु राबता दिसतसे...नाही कशाला उणे
मंत्रांच्या वलयात सारि दिपली श्रीमंत गर्दी पहा
संपे पूजन भोजनादि क्रम तो सारे निघाले गृहा

देवा यांतच एक मीच करतो चिंता उद्याची खरी
पौरोहित्य करूनही मज मिळे दारिद्र्य का रे उरी?

- निलेश पंडित
३१ जुलै २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा