मासारंभी तुलाच देतो पगारातली रक्कम सारी
असाच बघ मी हडकुळलो अन् तू झालिस की भक्कम भारी!
असो कसेही घरात येत्या लक्ष्मी वरती नकोच ठपका
हडकुळण्याला तसेच कारण - तुझ्या हातची लज्जत न्यारी!
तरी बरे हो! स्पष्टपणे मी तसा एरवी बोलत नाही
कारण सोपे...ऐकत बसतो तिखट तुझी वक्तव्ये सारी!
न्यायी होउन समान केले तूच आपल्या भाग जिण्याचे
अधिकारांची ठेव तुला अन् मला मिळाली जबाबदारी!
"पंडित" आता पुरती कळली, वैराग्याची अमाप महती
तू वा देवी! कृपा करावी...माते आता तारी तारी!
- निलेश पंडित
२६ जुलै २०१२
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा