झोपडपट्टीतील झोपडीचा आडोसा
धरून माझ्याकडे सारखा पहात राही
शीतपेय हातातिल माझ्या पिता पिता मी
शेंबुडलेली नजर दुधारी चुकवू पाही
आई त्याची घरी कुणाच्या भांडी घासे
अथवा फोडी दगड कुठे टाकीत उसासे
कधी फिरे तो अनाथ केवळ फलाटावरी
मी टाळतसे बघणे हे नशिबाचे फासे
आवर्तातच बेकारीच्या दिसे पुढे तो
गळ्याभोवती लालतांबडा रुमाल बांधे
कधी नशेच्या विळख्या मध्ये सुरा दाखवी
हात पसरण्या करी कधी अन् डोळे मिंधे
.................
तो...तो...म्हणता किती झटकले आम्ही असले
तुडवित गेलो मार्ग चोख अन् सौख्य-दिशेचे
दो रुपड्यांतच कामे केली त्यांनी आमची
खरेच जगले कोण असे हे दिवस नशेचे?
असो - बदलला विवेक माझा...मी ही शिकलो
विचार त्याचा आता नाही करत फारसा
अजूनही येतो पण स्वप्नी आणि छळे तो
विवेकास अन् भित्या मना दाखवी आरसा
- निलेश पंडित
१५ जुलै २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा