हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३ जुलै, २०१२

चर्चा

चर्चा

उपदेश, प्रवचनं....
कीर्तनं, व्याख्यानं...
...चर्चा म्हणून जातात खपवली
परिणामांची घ्यावी
जबाबदारी ज्यांनी
...त्यांनीच वैचारिकता संपवली

चर्चेचे नियम असावे समान
ना कोणी मोठा, ना लहान
विचारावे प्रश्न
कुणीही, कुणालाही
ना ऐकणारा क्षुद्र
...ना बोलणारा महान

करावी ज्या शब्दांत चर्चा
त्यांना असावेत फक्त
रूढ अर्थ
करून संज्ञा मलीन
नसावेत सोयीने अनर्थ

"सांगू आम्ही...
अनुभवा तुम्ही..."
ही जरी असेल नीती
पटण्याजोगी
स्वच्छ...शुद्ध...
असावी सकस अनुभूती

वाहत्या स्वच्छ पाण्यासारखी
असावी बदलाची ओढ
स्वच्छ उक्ती...स्वच्छ युक्तीला
असावी स्वच्छ कृतीची जोड

"ज्येष्ठ म्हणून श्रेष्ठ"
याहून अधिक असावेत
चर्चेचे निकष
अनुमान, सिद्धता, तर्कांनी
व्हावी चर्चा परिपूर्ण
सर्वंकष

अधिकारांना असावी
जबाबदारीची बेडी
सुजाणता हवी....
नको अंधश्रद्धा वेडी

प्रत्येक चर्चेत पडावं नित्य
उगवत्या पिढीचं पुढचं पाऊल
मानव्याच्या परिपूर्णतेची
पिढीगणिक देत चाहुल

- निलेश पंडित
२६ जुलै २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा