हा ब्लॉग शोधा

बुधवार, १८ जुलै, २०१२

सुरवंट

माझ्या पहिल्या प्रेमाचा पोत
नव्हताच कधी
अस्सल..जातिवंत...
गर्भरेशमी...
ढगांकडे बघून
आकाश पांढरं
समजलो मी...

वेड लावत
गेली जेव्हा
हिरवीगार निसर्गसृष्टी...
काळ्या मातीकडे कधी
वळली नाहीच दृष्टी...

रसनेला तृप्त करणाऱ्या
स्वादाचा लागला नाद...
तेव्हा त्या
पाककुशल हातांना
द्यायचीच राहिली दाद...

तृप्त करून गेले
सतारीचे गोड सूर
आणि नर्तकी
लयीत नाचणारी...
पण जाणिवेपासून
राहिली दूरच
ती तार
बोटांना काचणारी...

दिसत गेलं
तिथे प्रीत जडली
खोलाचा वेध घेताना
मात्र नजर अवघडली

झालं - गेलं - होउन गेलं
प्रेम केलं
रेशीम देणा-यावर...
आता मात्र मन जडलं
घाम गाळून
कोष फोडून
कष्टाने बाहेर येणा-यावर

- निलेश पंडित
१८ जुलै २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा