कविता
कल्लोळ असो मोदाचा
वा असोत कढ दुःखाचे
वा शांत स्वस्थ मी आणिक
मनि विचार वैराग्याचे
ती अवचित मजला स्मरते
शब्दांस पुरुनही उरते
शब्दांच्या आडुन येते
...अन् कविता मजला स्फुरते
मम हृदय कधी गहिवरते
कधि डोळा अश्रू भरती
स्नायु कधि फुरफुरती
कधि घर्मबिंदु पाझरती
मम रक्त कधी सळसळते
हृदय कधी कळवळते
मन मनरंगांवर खिळते
...मम कविता मजला कळते
भीतीने कापून थरथर
हृदयाची होते धडधड
मग माझा मीच शरमतो
मनि ठरतो माझ्या भेकड
कधि मग्रूरीने उसळुन
बेताल मत्त सरसावुन
पाऊल वाकडे पडते
...त्यातून हि कविता घडते
परी असंख्य वेळा जेव्हा
मति कुंठित होउन जाते
त्या दारुण संकटकाळी
मन निष्क्रियतेने थिजते...
...मग अज्ञातातुन येतो
तव आधाराचा हात
शब्दांचे राज्यच सरते
कविताही माझि न उरते
त्या अज्ञातास दिपूनी
...कविताही मागे फिरते
- निलेश पंडित
१५ मे २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा