अंधारयात्रा
 
 या तमोमय यात्रेची
 अंधारात सुरूवात
 मार्गि काळोख भयाण
 शेवटही अंधारात
 अंती तमाच्या जोडीला
 वेदनांचे सर्प दंश
 देही विषाच्या वाढीला
 कष्टा दुःखा चेही अंश
 आंधळ्यांच्या प्रवासाला
 येथे बहि-यांची साथ
 आणि थोट्यान्च्या हातात
 इथे पांगळयांचा हात
 मार्गातील काटे कुटे
 टोचतात....ऊर फाटे
 वाट चालता चालता
 प्रवासाला जीव विटे
 
 परि अवचित येता
 केव्हा मंदसा सुगंध
 किंवा कानी पडे जेव्हा
 कुठे लकेर स्वच्छंद
 वाटे पलीकडे दिसे
 कधी निरभ्र आकाश
 जणू कोणी मूर्तिकार
 कोरी शिल्प सावकाश
 
 कला विनोदाचे क्षण
 देती आयुष्या प्रकाश
 जशी चमकावी वीज
 उजळीत अवकाश
 
 - निलेश पंडित
 १० ऑक्टोबर २००८
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा