हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

महाविद्यालय 2

(वृत्त: शार्दूल विक्रीडित)
या पाहू अमुची इमारत...पुढे मोठे मनोरे पहा
"आ" वासून उगाच काय बघता?...येथे अशा या दहा !
स्थापत्यावर कोटिकोटि रुपये आहेत हो खर्चिले
व्यापारी इथले उदार सगळे...त्यांनीच दानी दिले

ज्ञानाच्या क्षितिजा अथांग करण्या येती जनांचे जथे
विज्ञानात, कलेत वा इतरही क्षेत्रांत विद्या इथे
शाळेच्या परिघास पार करुनी जो जो इथे पोचतो
तो तो थोर, विशाल, ज्येष्ठ ठरण्या स्वप्नांस गोंजारतो

येथे फक्त शिकावयास असती कोट्याधिशांची मुले
बाकीच्यांस अशक्यप्राय शिकणे येथील खर्चामुळे
लक्ष्मीवर्धक उच्च, योग्य पदव्या सर्वांस ज्या लाभती
त्या योगे सगळे हुशार जन हे लक्ष्मीस सांभाळिती

जागेचा इतिहास काय पुसता...होत्या इथे झोपड्या
एका रात्रित पार माग पुसला तोडून भिक्कारड्या !

- निलेश पंडित
२१ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा