हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

कोळीष्टक


काल नाही लिहिली कविता मी
जळमटं साचली मनात
ती तशीच
चिकटशी...न सुटणारी..न तुटणारी
घेऊन बसलो
शांत...विषण्ण
टेकून भिंतीला
खिडकीतून समोरचा वृक्ष न्याहाळत
तो ही...मी ही खिन्न

संधिप्रकाश विरला
कोळीष्टकं घामाला
अधिकच चिकटली...
समोरच्या वृक्षातून
वटवाघळं
बाहेर पडली...फिरली
पुन्हा जाऊन बसली त्या वृक्षात...
मुरली

अंधार साचला
वाढला तसा काचला
माझ्या मनाला
एकेक पारंबी
भयाण चिकट
कोळीष्टकं घेऊन
अधिकच लोंबली
ग्लानीत माझी
दृष्टी थांबली
.................
आता फटफटलंय
नवीन पाखरांचे आवाज...
उष्ण स्वच्छ सूर्यप्रकाश...
कोळीष्टकं आहेत
पण सुटतायत...
थोडासा प्रकाश येतोय
खिडकीतून माझ्या कडेही

....माझ्या पुढच्या कवितेची
वेळ झाली


- निलेश पंडित
१० ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा