हा ब्लॉग शोधा

रविवार, १२ ऑगस्ट, २०१२

प्यादी



उदात्ततेच्या पोटामध्ये
छिद्रान्वेषी वैचारिकता
लोकशाहिच्या सोंगामागे
गुदमरणारी नागरीकता

सुवर्ण लेपाखाली दिसते
अप्पलपोटे पितळ बेगडी
सभ्य धुवट बुरख्यातच वसते
पशू विकृती हिंस्त्र नागडी

अहंकार...उद्दामपणाही
विद्वत्तेच्या पोटी रुजतो
अहिंसकाचे रक्षण करण्या
अखेर कोणी हिंसक धजतो

हत्ती-घोड्या-उंटांमध्ये
आंठ असुनही प्यादी दुबळी
यशस्वितेच्या कोष्टकातली
मोजदाद शक्तीवर सगळी

कष्टकरी प्यादयांच्या वस्त्या
पटापटावर सदैव जळती 
वजीर राजे माजुन खाती
उरले घेउन उंदिर पळती

- निलेश पंडित
५ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा