पिकल्या केसा कलप लावुनी उगाच नटणे नकोच आता
फक्त दिखाऊ स्वातंत्र्याचा डंका पिटणे नकोच आता
दारिद्र्याच्या रेषेखाली पस्तीसाचे चाळिस झाले
पहिल्या शंभर श्रीमंतांचे कौतुक करणे नकोच आता
क्षुल्लक कारण पुरते होण्या दंगल नाक्या नाक्या वरती
सर्वधर्मसमभाव वगैरे गप्पा कुटणे नकोच आता
पाट वाहुनी रक्ताचेही जमिनी झाल्या कोरडवाहू
"शेतकरी देशाचा पाया" फुकाच म्हणणे नकोच आता
"सगळे करती म्हणून करतो" म्हणून भ्रष्टाचार कशाला?
दैनंदिन जगण्यात स्वताच्या बोथट असणे नकोच आता
गादी उसवुन कापुस येतो तशीच बेकारी बुजबुजता
डॉलर कमवुन मदत द्यायची खंत वाटणे नकोच आता
"नकोच आता" चा ही पाढा "पंडित" आता बंद करावा
"हवे काय" ते शोधू आणिक निव्वळ रडणे नकोच आता !
- निलेश पंडित
१५ ऑगस्ट २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा