आठवतं आठ वर्षांपूर्वी, बहात्तरीच्या तरण्याताठ
फुटतात लाह्या तसं बोलंत, आवाजाला जोर अचाट
पुढली भेट लग्नात एका, कोणाच्या तरी नातीच्या
तोंडी वीज नाचवत चालत, पण सहा-यानं काठीच्या
दहा वर्षांत भेट तीनदा, जिभेवर घेऊन फोडणी
तरुणाईची लगबग - त्यातच उत्साहाची वर जोडणी
ठसठशीत कुंकू लावलेलं, दागिन्यांचा भरपूर सोस
स्वयंपाकात सतत लुडबूड, हाताला चवही भरघोस
खडा आवाज लावत बोलत, "म्हातारी नाहीच हो मी...
कमरेत वाकले थोडी पण...आवाका नाय झाला कमी !"
पण सांत्वनास गेलो परवा, तेव्हा म्हणाल्या, "पुरे आता...
..पाहते तुम्हाला सर्वांना...डोळे भरून...जाता जाता..."
- निलेश पंडित
१३ ऑगस्ट २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा