असं नेहमीच होतं...
आभाळ होतं
भयाण...धूसर..ढगाळ..
स्वच्छ पाणी जातं वाहून
मना लागे
केवळ गाळ..
कारण काय
उमजत नाही
गूढ पोकळी
ग्रासते जरा..
चव...शब्द...सूर
निष्प्रभ
त्रस्त दिसते
अवघी धरा..
चिडचिडतो
मग मी ही थोडा
एकेक पाउल
घेतो मागे...
जाळं विणता विणता
थांबून
तोडत जातो
सारे धागे...
कळत नाही
कशी...कधी
पोकळी देखील
मागे फिरते...
आकाश होतं
स्वच्छ...निरभ्र
धूसरतेची
छाया सरते
सुरळीत सारे
चालू असता
गाफील होत जातो
मी ही...
वाटतं
नेमक्या याच क्षणाची
वाट बघते ती
पोकळी ही !
- निलेश पंडित
१९ ऑगस्ट २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा