(फसव्या सुंदर जगास पाहुन
एक हुंदका नकळत देउन...)
उन्मादातच बोलु लागले
सृजनशील ते काही वेडे
"विश्व चांगले वरवरचे हे ...
नष्ट करू या...थोडे थोडे...
देउ लागलो त्यांस दाखले
अम्ही शहाणे संतापुन मग
ऐकुनि आशावाद आमुचा
वेडे म्हणती, "या पाहू जग..."
म्हटले आम्ही बांधत जातो
नक्षिदार किति सुंदर भिंती
वेडे म्हणती, "आम्हा सारखे
त्यांस पाडुनी मने जुळविती"
आम्ही म्हटले आम्ही रचतो
वैज्ञानिक अन् बलाढ्य सृष्टी
वेडे म्हणती, "अम्हांस प्यारी...
हिरवी हिरवी निसर्ग दृष्टी !"
म्हटले आम्ही घडवित जातो
परंपरा अन् धर्म संस्कृती
वेडे म्हणती, "सुधारतो त्यां...
त्यांतिल करुनी नष्ट विकृती"
भडकुन त्यावर म्हटले आम्ही..
"ठारच वेडे...ठारच वेडे..."
(कुणी म्हणावे कुणास वेडे...
मनोमनी पण पडले कोडे...!)
- निलेश पंडित
२५ जुलै २०११
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा