कुरळे केस नि सतेज कांती, स्वच्छ निळे प्रामाणिक डोळे
सुरकुतलेला जरी चेहरा, वाक्पटुता वाणीतुन खेळे
अनुभव सारे पचवुन रक्ती, झाला होता अखेर थंड
गुर्मी जिरुनी तरुणपणाची, विझले होते बौद्धिक बंड
स्वैराचा अन् स्वातंत्र्याचा कुण्या काळचा अजेय भोक्ता
मनस्वितेने पाश तोडुनी अता एकटा उरला होता
वर्षे पस्तीस...संसाराची क्षणार्धात झुरळासम झटकुन
गिरवित बसला कडवट पाढा एकाकी मग मनात वाकुन
पाश्चात्त्यांच्या यशस्वितेचे अनेक पैलू शिकवी मज तो
कळले नाही परंतु त्याला बंधनातही सुखान्त रुजतो
अतिरेकाने होय विकृती स्वच्छ निखालसशा मूल्यांची
विषण्ण करते मला आजही फासावरची अखेर त्याची
- निलेश पंडित
२५ जुलै २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा