हा ब्लॉग शोधा

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

राग


राख सरून बाजूला
निखारे व्हावे प्रदीप्त
तसा फुलतो...धुमसतो...
होतो
लालबुंद...संतप्त
वावटळीत
विचार विरतात
उकळते भाव उरतात
मनाची...शरीराची होते लाही
नुरतात व्याख्या...तर्क..संज्ञाही

विवेक हरवतो
थरथर कापतो
उसळतात खवळतात डोळे
चेहरा...नाक उष्ण होतात
जणू परजतो मी सुळे

थरकापतात माझी माणसं...पिलं
भयभीत होऊन पाहतात बिचारे
अखेर होतो शांत...
निवतो...
येतात कोठूनसे
शीतल वारे
................
स्वतःवरच रागावून
अंतर्मनात मागाहून
वाटते खंत...
अपराधीपण...
...शरमतो अधिक त्याहून

वाटून जाते मलाच माझ्या
पशूत्वाची खोल भीती
असो...
गवसतात यातूनच
संयमाच्या चार रीती !

- निलेश पंडित
३१ जुलै २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा