हा ब्लॉग शोधा

रविवार, २ सप्टेंबर, २०१२

नाव


तार छेडणे जमले नाही, सूर लावणे जमले नाही
कान तरीही आसुसले अन्, सूर टाळणे जमले नाही

लिहीत गेलो काही बाही, वाचित गेलो तसेच काही
शब्दांपलिकडल्या विश्वाचा प्रवास करणे जमले नाही

रंगीबेरंगी दुनियेचे चित्र भले मी छान काढले
सृष्टी मधल्या रंगांचा पण माग काढणे जमले नाही

उलटे सुलटे कितेक अद्भुत खेळ तसे मी बरे खेळलो
इतरांचेही खेळ पाहण्या स्वस्थ राहणे जमले नाही

पान, काथ अन् चुना सुपारी, तशी चाखली तंबाखूही
रस्त्यावरती इथे तिथे पण कधी थुंकणे जमले नाही

भेटत गेलो, बोलत गेलो, खळखळुनी हसलोही आपण
"पंडित" माझे नाव परंतू, तुला लावणे जमले नाही !

- निलेश पंडित
२ सप्टेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा