गझल लिहाया इतर कवींच्या सा-या गझला चाळत जा
शेर रचूनी हार कराया रदीफ गुपचुप माळत जा
चलाख चोरांना शोभावे ऐसे नंतर सोंग करा
करू नका शेराची कॉपी शब्द त्यातले गाळत जा
" 'अमुक तमुक' रावांच्या गझला कधी वाचता का आपण?"
समीक्षकाचा आव आणुनी श्रोत्यांना पडताळत जा
कधी भेटुनी खराच शायर तुम्हा विचारे जाब जरी
"विचार अपुले मिळते जुळते!" म्हणून त्या कवटाळत जा
गझलेवरती टिका कराया कोणी श्रोता धजे जरी
"योगायोगाच्या गोष्टी या" म्हणुन स्थिती सांभाळत जा
"व्यासंगाने, प्रतिभेने...सर...हाताळावी गझल कशी?"
प्रश्न भाबडे - तुम्हास अवघड जरा खुबीने टाळत जा
सृजनशीलता, कष्ट वगैरे इतरांवरती सोडुन द्या
अर्थाची ना फिकिर करावी, नियम तेवढे पाळत जा
"पंडित" केवळ नाव नसावे, अशी उपाधी जास्त बरी
श्रेय लाटण्या मार्ग आयते, नवनवीन चोखाळत जा
- निलेश पंडित
४ सप्टेंबर २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा