हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

इमला


ठाउक आहे मला व्यवस्थित...म्हातारा होईन उद्या
घुसमटणा-या तरुण पिढ्यांचे पण मत मजला मांडू द्या

मध्यमवर्गीयांची दुःखे मी ही अनेक अनुभवली
बेकारीच्या, अस्थैर्याच्या भितीत वर्षे घालवली

शासकीय वा ठाम नोक-या धरून तेव्हा जे जगले
खेडी सोडुन गेले....तेव्हा त्यांचे वृद्ध हि तगमगले

"पुत्र पौत्र, धन धान्य मिळावे...मस्त जगावे सौख्य भरे"
ही स्वप्ने पुस्तकात उत्तम...नशिबाचे फासेच खरे

विभक्त वा एकत्र राहणे यास कारणे कितीतरी
परिस्थितीसापेक्ष भूमिका - तत्वे दोहोंमध्ये खरी

कळे मला ना समाज समजे का वृद्धाश्रम ही व्याधी?
स्वास्थ्य समाजाचे जपण्यास्तव घाम जरा गाळू आधी!

वृद्धाश्रम ही तडजोडच पण अनेकदा गरजेपोटी
परिस्थितीच्या फासातुनही नवी पिढी तगण्यासाठी

पर्यायांचा विचार करता अखेर सुचती दोन मला
अलग राहु या भरल्या पोटी अथवा कोसळु दे इमला !

- निलेश पंडित
११ सप्टेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा