संपे प्रवास माझा, मंझील दूर आहे
डोळ्यांत शांतता पण, हृदयात पूर आहे
म्हणतो, "खुल्या दिलाने..घेतो निरोप आता"
भरुनी तरी अचानक, येतोच ऊर आहे
मी घातली गवसणी, वाद्यात नाद नाही
थकल्या गळ्यात तरिही, अडकून सूर आहे
आली अखेर जेव्हा, असहाय्य मी असा की
कर्तृत्व सर्व माझे, शरमून चूर आहे
इस्टेट वाटण्याचा, जो कुजबुजाट झाला
तो ऐकताच कळले, जो तो फितूर आहे
"पंडित" अता निराशा, झटकून टाक सारी
मुक्तीत चांदण्याची, वृष्टी टिपूर आहे
- निलेश पंडित
८ सप्टेंबर २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा