अंधारात... एकांतात...
बसून स्वस्थ...
डोळे विस्फारून पाहता
भूत काळाच्या विवरात डोकावता
बरंच काही...बरंच काही दिसतं
मुंग्यांच्या वारुळात अजाणतेपणी
गंमत म्हणून टाकलं
उकळतं पाणी
एक चावला
म्हणून ठेचून मारले
शेकडो...हजारो मुंगळे
घेतलं होतं
अख्खं अंग आक्रसून तेव्हा...
केविलवाणं भिकारी पोर
स्वच्छ शर्टला हात लावेल
असं वाटलं जेव्हा
घरातल्या अगतिक म्हातारीला
ऐकवले चार शब्द उद्दाम
आयुष्याला कंटाळून
तिने जाईपर्यंत मुद्दाम
पौगंडावस्थेत पुस्तकं वाचताना
नजर बिथरली तेव्हा
कळूनही न कळल्यासारखं दाखवून
फक्त पदर सावरून
निघून जाणारी...
कधी मोलकरीण...
कधी शेजारीण...
शेकडो आत्मे
अनवधानाने दुखावलेले
...................................
पण जाणवतं
हा आहे दृकश्राव्य प्रत्यय
भूतकाळात डोकावताना
घोंगावतोय एक भीतीयुक्त आवाज...
माझाच...
त्याच विवरातून
कधी आढ्याकडे पाहात
मी ही असेन पडून
दुर्लक्षिलेला इतरांनी
अनवधानाने....
- निलेश पंडित
२८ सप्टेंबर २०१२
.
उत्तर द्याहटवास्वतःच्या मनाला तिर्हाइताप्रमाणे बघू शकता तुम्ही.
म्हणूनच अगदी साध्या शब्दातल्या कविता सुद्धा प्रचंड परिणामकारक आहेत.
मनापासून आभार शार्दूलजी!
हटवा