द्राक्षसुरा अन् जगण्यामध्ये आढळते मज साम्य विलक्षण
घोट घोट संपत जाताना उमगत जाते लक्षण लक्षण
द्राक्षे उत्तम सोलुन ठेचुन घ्यावी जैसी नष्ट न करता
खडतर अनुभव तसेच यावे आयुष्याचा रंग न उडता
किती शर्करा पुढे उरावी द्राक्षप्रकारच ठरवी मुरता
जखम भरावी स्मृती उरावी तशी सूज्ञता रुजण्याकरता
उत्तम द्राक्षे थिजुन राहती कितेक वर्षे...कधी युगेही
अनुभूतीचे दोरखंड बनतात तसे नाजुक धागे ही
मुरण्याच्या रीतींची आणिक रसायनांची किती विविधता!
जगतानाही अनुभूतींची तशी बदलते...नित्य...दग्धता
वर्षामागुन वर्षे जाता सुरेस मिळती स्वाद - नजाकत
पुढे जाउनी मागे बघता आयुष्याची कळते रंगत
सोडा, पाणी विसरू...उचला मादक द्राक्षसुरेचे पेले
आनंदाने करू साजरे....केस उडाले वा पिकलेले !
- निलेश पंडित
५ सप्टेंबर २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा