काळ बदलला, शतक बदलले - नेतृत्वाचे घटक बदलले
यंत्राचे षड्यंत्र होउनी तंत्र बदलले, मंत्र बदलले
तत्वांचाही पोत बदलला..."उच्च राहणी, विचार साधे"
उदात्त भाषेमागे दडती दुष्टपणा...अस्वच्छ इरादे
"हटवा आता कुटुंबशाही - नको घराणी, जुनी पुराणी"
म्हणणा-यांनी रुजवत नेली इथे अता त्यांचीच घराणी
जहाल गेले...मवाळ गेले...गेले डावे - उजवे "वादी"
प्रामाणिक वादांची सद्दी संपे...उरली पोकळ खादी
गेल्या सा-या संपत निष्ठा...समाज निष्ठा...स्वदेश निष्ठा...
एक एक पायरी चढाया जो तो पूजी स्वपक्षश्रेष्ठा
कंटाळुन या अधोगतीला मध्यमवर्गहि सुजाण झाला
दुर्लक्षुन राजकारणाला शिकण्या अन् शिकविण्या निघाला
स्वप्न एक आताशा बघतो - वर्तमान पत्रे इत्यादी
मलपृष्ठावर नेते ढकलुन खरेच व्हावी प्रगतीवादी !
- निलेश पंडित
६ सप्टेंबर २०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा