मिणमिणता प्रकाश असेल...
...असेल डळमळती आशा
दुरून पडेल...क्षीण कानी
मृत्यूरव सायंकाळी अशा
जन्मानंतर पाळण्यात होती
नजर धरण्याची धडपड जशी
क्षीण नजरेने ओळख शोधील
डुगडुगणारी मान तशी
विचारांचा तुटेल ओघ
तर्क जाऊन होईल भ्रम
तारुण्याची जिरून स्वप्ने
स्वप्नांचेही होतील श्रम
धावती...पुढची...पिढी होईल
धावत धावत दृष्टीआड
माझ्या पायांखाली राहील
रणरणता...माळ ओसाड
अशी असेल सायंकाळ
वेळीच नाही गेलो तर
म्हणून म्हणतो, "वेळीच ने...
...देऊ नकोस मला अंतर."
- निलेश पंडित
६ जून २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा